नागपूर- सध्या राज्यातील राजकारण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तापले असताना शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. देशातील कापूस उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट केव्हा थांबणार? असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राच्या माध्यमातून केला आहे.
०३ ऑक्टोबर या दिवशी अटल टनलच्या उद्घाटन वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना दलाल, आणि अडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवण्यासाठी तीन कायदे आणले, असा दावा केला आहे. हिमाचल प्रदेश फळे, भाजीपाला उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. सफरचंद ४०-५० रुपये किलो भावाने निघतात. दिल्लीत शंभर ते दीडशे रुपयांत पोहोचतात. मग, शंभर रुपये जातात कुठे? हीच व्यथा कापूस उत्पादकांची देखील आहे.
देशात कापसाचे भाव कमी असतात मात्र, कपड्यांचे भाव वाढतात ही स्थिती कायम असल्याचे जावंधिया यांनी म्हटले आहे. २०११-१२ साली ज्यावेळी देशात मनमोहन सिंग यांचे सरकार अस्तित्वात होते त्यावेळी ६० ते ६५ हजार रुपये खंडी रूईचे भाव होते. त्यावेळी मिल मालकांनी कापडाचे भाव वाढवले, ज्यामुळे कापडाचे भाव वाढले होते. आता गेल्या अनेक वर्षांपासून कापसाचे भाव सुमारे ४० हजार रुपये खंडी आहे. सद्यस्थितीत तर ३६ हजारे ३९ हजार रुपये खंडी आहेत. अशावेळी होजियरीचे भाव कमी झाले नाहीत. कापूस ते कापड हे गणित महाराष्ट्राला माहीत आहे. पण या मध्ये केवळ उद्योजकांचा फायदा होताना दिसतो आहे. मात्र कापूस उत्पादक शेतकरी अजूनही लुटला जातो. मग सफरचंदप्रमाणे कापसाचा नफा कुठे जात आहे. याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचा प्रश्न विजय जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.