नागपूर - शेतकऱ्यांना जीएम सीड वापरण्याची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी आज शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कृषीमंत्री व गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. यामध्ये कृषी तज्ञ सीडी माई, शेतकरी नेते अरुण केदार, माजी आमदार वामनराव चटप आणि विदर्भवादी राम नेवले यांचा समावेश होता.
भारतात जीएम सीड आणि एचटीबीटी या दोन्ही वाणांच्या विक्रीवर बंदी आहे. जगात जीएम सीडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. असे असतानाही भारत सरकारने त्यावर प्रतिबंध लावलेले आहेत.
तर कपाशीचे ‘एचटीबीटी’ वाण महाराष्ट्र वगळता इतर देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. हे वाण गुलाबी बोंडअळी प्रतिबंधक असल्याने तसेच त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने त्याचा राज्यात चोरून वापरत होत आहे.
एचटीबीटी वाण लपून-छपून वापरले जात असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीएम व एचटीबीटी बियाणे वापरण्याची परवानगी द्यावी, तसेच वापरणा्र्या शेतकऱ्यांवर कारवाई करू नका, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कृषीमंत्री दादा भुसे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली.