नागपूर - भ्रष्टाचाराचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज (दि. 11) सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा छापेमारी केली. तब्बल आठ तासानंतर सीबीआयचे अधिकारी कारवाई केल्यानंतर देशमुख यांच्या निवासस्थाना बाहेर पडले आहेत. कारवाई दरम्यान सीबीआयच्या पथकाला कोणते पुरावे मिळाले या बद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, काही फाईल्स सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सीबीआयने दुसऱ्यांदा कारवाई केली आहे.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सीबीआयचे एक पथक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले होते. यामध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश होता, त्यानंतर काही वेळाने आणखी दोन अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. सुमारे आठ तास झालेल्या कारवाईत सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या घरातील आणि कार्यालयातील प्रत्येक कागदपत्रांची तपासणी केली. त्यांच्या हाती नेमका कोणता पुरावा लागला याबाबत सीबीआयकडून खुलासा झालेला नाही.
आठ तास चालली कारवाई
सकाळी सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले यावेळी देशमुख कुटुंबातील कोणताही प्रमुख सदस्य घरात उपस्थित नव्हता. सीबीआयची कारवाई असल्यामुळे पोलिसांचाही तगडा बंदोबस्त त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला होता. सुमारे आठ तासांनंतर सीबीआयच्या पथकाने चार वाजता कारवाई पूर्ण केली. घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत असल्याने सीबीआयचे अधिकारी पोलिसांच्या सुरक्षेत घराबाहेर पडले.
देशमुख यांच्या घराबाहेर राडा
सीबीआयची कारवाई सुरू असताना संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. आक्रमक कार्यकर्त्यांनी सीबीआय आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर देशमुख यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवावी लागली होती.