नागपूर - टोळधाडीवर नियंत्रणासाठी कृषी विभाग पूर्ण प्रयत्न करीत असून, येत्या 2 दिवसात यावर नियंत्रण मिळेल असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर विभागात सुरू असलेल्या टोळधाडीचा आढावा भुसे यांनी घेतला यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अग्निशामक विभागाच्या गाड्यांच्या माध्यमातून टोळ धाडीवर औषधांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी या गाड्या जाणे अशक्य असल्याने ड्रोनचा वापरदेखील करण्यात येणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली. यासाठी 2 ड्रोनची व्यवस्था करण्यात आल्याचेही भुसे यांनी सांगितले.
मध्यप्रदेशातून नागपूर व अमरावती विभागात आलेल्या टोळधाडीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी शक्य असल्यामुळे टोळधाडीच्या निर्मुलनासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी दादा भुसे यांनी केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बॉटनिकल गार्डन येथे ड्रोनच्या प्रात्यक्षिकांची भुसे यांनी पाहणी केली.
![drone pesticide spraying for locust control says dada bhuse](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-06-tol-dhad-drone-spray-7204462_03062020203508_0306f_1591196708_611.jpg)
मध्यप्रदेशातून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ही टोळधाड आली आहे. गेल्या काही दिवसांपासून टोळधाडीमुळे शेत पिकांचे, भाजीपाला, फळबागा आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. नंतर ही टोळधाड पुन्हा मध्यप्रदेशातील जंगलात निघून गेली होती. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात दाखल होवू शकते. शेती पिकांचे नुकसान करणाऱ्या टोळधाडीवर कीटकनाशकांची फवारणी हाच एकमेव उपाय असल्यामुळे ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. एअरोनिका कंपनीच्या दोन ड्रोनचा वापर यासाठी करण्यात येत आहे. ड्रोनची क्षमता 10 लिटर कीटकनाशक व पाणी घेऊन फवारणी करण्याची असून, क्लोरोपायरोफॉस हे कीटकनाशक वापरण्यात येत आहे.