नागपूर- शहरातील शासकीय रुग्णालयाचा आणखी एक गलथान कारभार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी रुग्णालयाच्या वार्डात दोन कुत्रे फिरत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हारल झाला आहे. या आगोदरही रुग्णालयाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेसंदर्भात अनेक घटना घडल्या होत्या. मात्र, या घटनेतंतर रुग्णालय प्रशासन चांगले जागे झाले असून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वसन रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळ
सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आल्याचा दावा नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) कडून केला जातो. रुग्णालयात केवळ नागपूर जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातील ११ जिल्ह्यांसाह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश सह तेलंगणातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचाराकरिता या रुग्णालयात येतात. अल्पदरात उपचार मिळतो याकरिता गरीब रुग्णांसाठी नागपूर शहरातील या शासकीय रुग्णालयाचा मोठा आधार आहे. मात्र, या रुग्णालयात अव्यवस्थेचा बाजार असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. आता तर चक्क अनेक वार्डमध्ये मोकाट कुत्र्याचा मुक्त संचार बघायला मिळतो आहे. एवढंच नाही तर रात्री झोपलेल्या रुग्णाच्या बॅगेतील किंवा बाहेर ठेवण्यात आलेले खाद्यपदार्थ कुत्री खातात त्यामुळे रुग्णांचा आजार आणखी बळावण्याची शक्यता आहे.
दोषींवर कारवाई होणार
रुग्णालयाच्या सामान्य वॉर्डमध्ये मोकाट कुत्रे फिरत असल्याचा व्हिडिओ वायरल करण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांनी मेडिकल प्रशासनाला या संदर्भात सूचना देणे गरजेचे होते. आमच्यापर्यंत या घटनेची माहिती आली असती तर तात्काळ कारवाई केली असती. मात्र व्हिडीओ वायरल करून रुग्णालयाची बदनामी झाल्याचे मत रुग्णालयाचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.