नागपूर - शहरातील सक्करदरा पोलिसांनी मोठा ताज बाग परिसरातील एका घरी छापा टाकून तीन देशी बनावटीच्या माऊजर बंदुका जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शेख नदीम उर्फ राजा गोल्डन शेख नाजीम नामक आरोपीला अटक केली आहे. शेख नदीम उर्फ राजा या आरोपीनेचे आशीर्वाद नगरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींना बंदुका विकल्याची माहिती पुढे आली होती, ज्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
गेल्या आठवड्यातील बुधवारी नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या बेसा परिसरातील आशीर्वाद नगरात दोन गुंडांनी भाजी विक्रेता उमेश ढोबळे याच्यावर गोळीबार केला होता. यात उमेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी शेख शाकीर शेख हसन आणि सैयद इमरान सैयद जमील या दोघांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या तळाशी जाण्याचा निर्धार करून तपासाला सुरवात केली असता, शस्त्र पुरवल्याप्रकरणी शेख नदीम उर्फ राजा गोल्डन शेख नाजीम नामक आरोपीचे नाव पुढे आले होते. या आधारे पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे माऊजर आढळून आले, तर त्याच्या घरातून दोन माऊजर जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले.
आरोपी शेख नदीमवर ड्रग्सची तस्करी संदर्भातही गुन्हे दाखल
आरोपी शेख नदीम उर्फ राजा हा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर घातक शस्त्र बाळगणे यासह एमडी ड्रग्सची तस्करी करण्यासंदर्भांत देखील गुन्हे दाखल आहेत. भाजी विक्रेता उमेश ढोबळे खून प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी शस्त्र तस्करांच्या मुसक्या अवळायला सुरवात केली असल्याने येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी तरुण बनला दुचाकी चोर