नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून राज्यात भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'जेडीएसची पाच टक्के मतं काँग्रेसला' : पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात 1985 पासून कुठलेच सरकार पुन्हा सत्तेवर आले नाही. यावेळी आम्ही तो ट्रेंड मोडू असा आम्हाला विश्वास होता, मात्र ते शक्य झाले नाही. ते म्हणाले की, 2018 मध्ये आम्हाला 36 टक्के मतं मिळाली होती, यावेळी आम्हाला 35.6 टक्के मतं मिळाली आहेत. आमची फक्त अर्धा टक्के मतं कमी झाली, मात्र आमच्या जवळपास 40 सीट कमी आल्या आहेत. 2018 मध्ये जेडीएसला 18 टक्के मतं मिळाली होती. यावेळी त्यांची जवळपास 5 टक्के मतं कमी झाली आणि ही मते कॉंग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला हा विजय मिळाला आहे. भाजपची मते कुठेही कमी झाली नाही.
उत्तर प्रदेशात भाजपचं नंबर वन : फडणवीस पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या स्थानिक निवडणुकांमध्ये आज भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय मिळवला आहे. कर्नाटकात जे काही झाले त्याचा कुठलाही परिणाम देशातील आणि राज्यातील निवडणुकांमध्ये होणार नाही. देशामध्ये मोदी सरकार आणि महाराष्ट्रात भाजपा - सेना युतीचेच सरकार येणार, असे ते म्हणाले.
'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' : कर्नाटक निवडणूकीत काँग्रेसच्या विजयामुळे उद्धव ठाकरे गटाला फारचं आनंद झाला आहे. हे म्हणजे 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना', अशी परिस्थिती असल्याचा टोला फडणवीस यांनी लावला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही. राष्ट्रवादीचा उमेदवाराला पॅक करून परत पाठवा, हे माझं निपाणीच्या लोकांनी ऐकलं. उद्धव ठाकरे यांच आधीपासूनच ठरलं आहे. एखाद्या महानगर पालिकेच्या निवडणूकीत जरी भाजपला अपयश मिळालं तरी ते मोदी, शहा यांच्यामुळेच असे ते म्हणतात, असे फडणवीस शेवटी म्हणाले.
हेही वाचा :