नागपूर - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा सोबतच थकीत वीज बिल वसुलीच्या मुद्यावरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. सरकारला थकीत वीज बिलाची सावकारासारखी जबरदस्ती वसुली कारायची आहे, म्हणून सरकारकडून बाऊ केला जात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना बोलत होते.
जबरदस्ती वसुलीसाठी नाटक सुरू
एकीकडे कोरोनामुळे राज्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी सरकारला त्यांच्याकडून जबरदस्ती वसुली करायची असल्याने हे नाटक सुरू केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या काळात वीज बिलाची थकबाकी वाढली असल्याचे दिसून येते, असे फडणवीस म्हणाले.
आम्ही निवडणुकीला समोरे जाणार
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे आता निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे आम्ही निवडणुकीला नक्की सामोरे जाऊ. मात्र, सरकार जे बोलतोय ते कृतीत दिसत नाही हे यातून स्पष्ट झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अधिवक्ता कुंभकोणी संदर्भातील प्रश्नाचा मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण कुंभकोणी यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे की प्रवीण दरेकर बोलीभाषेत बोलले आहेत. त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढणे योग्य नाही. सध्या राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नसल्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय ओबीसी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली मंत्री वडट्टीवारांची भेट; 'या' आश्वासनाची करुन दिली आठवण