नागपूर - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली. वारिस पठाण यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. देशात 100 कोटी हिंदू आहेत, म्हणूनच त्यांना इथे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. एखाद्या मुस्लीम देशात असे बोलले असते, तर काय अवस्था झाली असती, हे त्यांना कळले असते असेही फडणवीस म्हणाले.
हिंदू सहिष्णू आहेत. मात्र, त्यांच्या सहिष्णुतेला कमजोरी मानण्याची चूक वारीस पठाण यांनी करू नये असेही फडणवीस म्हणाले. सर्वात आधी वारिस पठाण यांनी हिंदूंची माफी मागावी. तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काय म्हणाले होते वारिस पठाण
वारिस पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. जर आम्हीही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.