नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी केला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवण्याच्या आदेश दिला होता. फडणवीस यांनी अर्ज भरताना फॉर्म क्रमांक 26 मध्ये 22 गुणांची माहिती दिली होती. मात्र, दोन खाजगी गुन्ह्याचा उल्लेख सुटला होता. जेव्हा की नियमानुसार सर्व गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक होते. त्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण स्थानिक न्यायालय, नंतर उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने खटला चालविण्याचा आदेश दिल्यावर नागपुरच्या प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयात खटला सुरू करण्यात आला.
आमदारकी रद्द करण्यात यावी : फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी वकील सतीश उके यांनी केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जून रोजी होणार आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आरोप नाकारले : 15 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते. तेव्हा त्यांनी सर्व आरोप मान्य नसल्याचे कोर्टाला सांगितले होते. आत्तापर्यंत या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने फडणवीसांना आपले काय मत आहे, असे विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्यावर राजकीय वैमनस्याने प्रेरित आरोप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले कोर्टाला सांगितले.