नागपूर - खासदार नवनीत राणा कौर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या खासदारकीला आवाहन देणारी एक याचिका अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली आहे, सध्या ही याचिका न्याय प्रविष्ट आहे. मात्र कालच मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा कौर यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. या निकालाचा दाखला देत नवनीत राणा यांची खासदरकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती, अडसूळ यांचे वकील राघव कवीमंडन यांनी दिली आहे, त्यांनी या संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
अभिनेत्री ते खासदार असा प्रवास करणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा कौर यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनीत राणा कौर यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांना पराभूत केलं होतं. अमरावती लोकसभा क्षेत्र अनुसूचित जाती करता राखीव आहे. नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या नसल्याचा आक्षेप घेत अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे, त्यावर पुढील महिन्यात सुनावणी सुरू होण्याची शक्यता असल्याचे राघव कवीमंडन यांनी म्हटले आहे.
नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार - कवीमंडन
मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा कौर यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने, त्यांच्या विरुद्ध नागपूर खंडपीठात न्याय प्रविष्ट असलेल्या याचिकेला बळकटी आली असल्याचं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे वकील राघव कवीमंडन यांनी म्हटले आहे. या निकालाचा दाखला देऊन आपण नवनीत राणा यांची खासदारकी रद्द कण्याची मागणी न्यायालयात करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काय आहे प्रकरण?
खासदार नवनीत राणा यांची जात नेमकी कोणती? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ३० ऑगस्ट रोजी मुंबईच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अनुसूचित जातीत समावेश होणाऱ्या मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. त्याच्या आधारे त्यांनी २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तर 2019 मध्ये त्यांनी अडसूळ यांचा पराभव करत विजय मिळवला.
हेही वाचा - Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नव्हता.. मुसळधार पावसाने साचले पाणी - महापौर