नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमध्ये गर्भवतींना प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यात अडचणी होत्या. केवळ इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय अथवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथेच प्रसूती करता येत होती. नागपूर महानगरपालिकेने आता पाचपावली सुतिकागृहात कोरोना पॉझिटिव्ह स्त्रियांच्या प्रसूतीची व्यवस्था केली आहे. येथे एका कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसूती यशस्वीपणे करण्यात आली आहे. माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
गर्भवतींच्या प्रसूतीची व्यवस्था मेडिकल अथवा मेयोशिवाय कुठेही नसल्यामुळे कोरोनाबाधित गर्भवतींची फरफट होत होती. याबाबतची गरज ओळखून मनपाच्या रुग्णालयात व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. महापौर आणि आयुक्तांच्या पाठिंब्याने पाचपावली प्रसूतिगृहातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संगीता खंडाईत (बालकोटे) आणि डॉ. वैशाली मोहकर यांनी पुढाकार घेतला. लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांची प्रसूती करण्याची व्यवस्था केली. यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयाच्या बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. आनंद कांबळे, बाल रोग तज्ज्ञ डॉ. विंकी रुगवाणी आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. दीप्ती शेंडे यांची मदत घेतली. या सर्वांच्या मदतीने झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ३० वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हे त्यांचे दुसरे बाळ आहे.
पाचपावली कोरोनाबाधित गर्भवतींसाठी सुतिकागृहात २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात मनपाच्या वतीने डॉक्टर्स आणि परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.