नागपूर - शेवटचा कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर 28 दिवसपर्यंत तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेन्मेंट झोन म्हणून ठेवण्याचे केंद्रीय आरोग्य खात्याचे निर्देश आहेत. त्यानुसारच नागपुरातील विविध परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. नियमप्रमाणेच या प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध उठवण्यात येतील, अशी माहिती नागपूरचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
प्रतिबंध ठेवण्यामागे वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारणे आहे. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका. नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपुकरांना केले आहे.
नागपूर शहरात आत्तापर्यंत 21 विविध ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने हे 21 परिसर सीलकरून कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. या पैकी 11 झोनमधील नियमांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. काही कंटेन्मेंट झोनमध्ये 14 दिवस उलटल्यावर एकही रूग्ण समोर न आल्याने त्या क्षेत्रातील नागरिकांनी परिसर कंटेन्मेंट झोनमधून वगळण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पांढराबोडी, पार्वती नगर, जवाहरनगरचे नागरिक कंटेन्मेंट झोनमधून बाहेर येण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
मात्र, कंटेन्मेंट झोनबाबत केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या निर्देशानुसार कार्य होत असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. १४ ते २८ दिवसांपर्यंत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अडीच टक्के असल्याने परिसरातील कोरोनाचा शेवटचा रूग्ण सापडल्याचा 28 दिवसापर्यंत तो परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात येतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनीही कुठल्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे. नागपूर शहर कोरोना मुक्त करण्यास मदत करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.