नागपूर : काही लोकांना वाटते की सारे काही आपल्याच काळातील आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. अडीच वर्षांपैकी सव्वा दोन वर्ष ते बंद दाराआड होते. उर्वरित दोन-तीन महिन्यात त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल तर मला त्याबाबत माहिती नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला ते नागपूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
केंद्र सरकारकडून ठराव मंजूर: औरंगाबाद आणि उस्मानाबाद दोन शहरांच्या नामकरणाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. हा ठराव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. केंद्राने काल त्याला मंजुरी दिली आहे. राज्याच्याही सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे शहराचे नाव बदलले आहे.
नाव न घेता केली टीका: उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता नगरविकास आणि महसूल विभागाच्या अधिसूचना जारी होतील. त्यानंतर संपूर्ण जिल्हा, तालुका, महापालिका आणि नगरपालिकेचीही नावे बदलतील. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा यासाठी अत्यंत आभारी आहे. पण, काही लोकांना वाटते सारे आपल्याच काळातील आहे. कदाचित ते हेही सांगू शकतात की, त्यांनी मोदीजींना फोन केला आणि त्यामुळे हे नामकरण झाले, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचे धाबे दणाणले: कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहे. मविआकडून आता रडीचा डाव सुरू आहे. धंगेकर हे मतदारांचा अपमान करीत आहेत. भाजपा कधीच पैसे वाटत नाही. त्यामुळेच लोक आम्हाला निवडून देतात. आमची संस्कृती पैसे वाटण्याची नाही, ती काँग्रेस-राष्ट्रवादीची संस्कृती आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने असले उद्योग केले जात आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मुख्यमंत्र्यांची टीका: मागील दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कसबा पोटनिवडणूकीसाठी ऑनलाईन प्रचारसभा घेतली होती. या ऑनलाईन सभेवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऑनलाईन सभेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, आमचे जुने नेते त्यांनी काल पुण्यात ऑनलाईन सभा घेतली होती. आम्हाला वाटले होते सत्ता गेल्यानंतर ते लाईनवर येतील, तरी त्यांना कोणी सांगितले की तुम्ही ऑनलाईन सभा घ्या. कारण हेमंत रासने हेच ही निवडणूक जिंकणार आहेत, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.