नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील(एसीबी) एका पोलीस निरीक्षकाविरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. पंकज उकंडे असे या एसीबी अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या पोलीस निरीक्षकावरच कारवाई करण्याची वेळ एसीबीवर आली आहे.
एसीबीच्या नागपूर कार्यालयात पोलीस निरीक्षक पंकज उकंडे कार्यरत आहे. त्यांने भूमापन कार्यालयातील लाचेच्या जुन्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या महिला अधिकाऱ्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. महिलेला सहआरोपी न करण्यासाठी ही लाच उकंडे यांनी मागितली होती.
हेही वाचा - सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घुमजाव
तक्रारदार महिला अधिकाऱ्याने एसीबीचा अधिकारीच लाच मागत असल्याची तक्रार नागपूरच्या एसीबी अधीक्षकांकडे केली. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक पंकज उकंडे दोषी आढळला. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर रात्री उकंडे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवला गेल्याचे समजताच पंकज उकंडे फरार झाला आहे.
जयताळा परिसरात उकंडे राहत असलेल्या फ्लॅटची एसीबीने तपासणी सुरु केली असून तेथील कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पंकज उकंडे चार महिन्यांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली होऊन आला होता. त्याच्याकडे भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्याचे प्रकरण सोपवण्यात आले होते. त्याच तपासादरम्यान उकंडेनी लाचेची मागणी केल्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांवर त्यांच्याच अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची नामुष्की ओढावली आहे.