नागपूर - नागपुरातील कोरोनाचा प्रकोप वाढत असताना शासकीय रुग्णलायात आकस्मिक रोग विभागात एकाच बेडवर दोन रुग्ण झोपण्याची वेळ आली आहे. यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असताना बेड मिळत नसल्याची ओरड होऊ लागली आहे. यात दररोज कोरोनाबाधित मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. यातच एका व्हायरल व्हिडिओमुळे परिस्थिती किती गंभीर होत चालली आहे हे पाहायला मिळत आहे. अशात कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही. अशात सामान्य कुटुंबांना शहरातील शासकीय रुग्णलयातही बेड मिळत नसल्याचा आरोप होत आहे. तर नागपुरातील गंभीर परिस्थितीला राज्यसरकार जबाबदार असल्याचा आरोप, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत परिस्थिती अधिक गंभीर
मागील वर्षात कोरोना प्रकोपाच्या काळापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर होत चाललेली आहे. रोज येणाऱ्या आकडेवारीतून बिघडत्या परिस्थितीचे नवीन विक्रम पाहायला मिळत आहे. एका दिवसात सर्वाधिक १७ हजार कोरोना चाचण्या आणि ४ हजार पार बाधित रुग्ण मिळण्याचा अहवाल बिकट परिस्थिती दर्शवणारा आहे. नागपुर जिल्ह्यात शुक्रवारच्या अहवालात ४ हजार ९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यामध्ये एकट्या नागपूर शहराची संख्या २ हजार ९६६ इतकी आहे. नागपूर शहरात कोरोनाचा शिरकाव गल्लोगल्ली झाल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयावरील भार प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे.
खासगी रुग्णालयात बेड वाढण्याचा प्रयत्न
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांसाठी अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शासकीय रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. शिवाय बेड रिकामे असल्यास कोणत्याही रुग्णाला परत पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना मनपा प्रशासनाने रुग्णालयांना दिल्याचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-Live Updates : राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी
हेही वाचा-नवी मुंबईत होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध; पालिकेकडून नियमावली जाहीर