नागपूर - सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने बाजारपेठांना काही मार्गदर्शक तत्वे व नियम आखून दिले आहे. मात्र, नागपुरातील कॉटन मार्केट परिसरात याच नियमांना धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठात येणाऱ्या कोणत्याही वाहनांची किंबहुना वाहन चालकांची थर्मल स्क्रिनींग न करताच प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सर्वच बाजारपेठांना शासनाकडून विशेष नियमाली आखून देण्यात आली आहे. त्यानुसारच बाजारपेठा सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहे. मात्र, नागपुरातील कॉटन मार्केट परिसरात या नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. परिसरात येणाऱ्या व्यक्तीचे व भाजी घेऊन येणाऱ्या वाहन चालकाचे थर्मल स्क्रिनिंग न करताच या बाजारपेठेत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे कॉटन मार्केट हे नागपुरातील मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातून देखील येथे भाजीपाला आणला जातो. कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग नाही. तसेच परिसर सॅनिटाईझ केला जात नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यावर प्रश्न निर्माण होत आहे. या बाजारपेठेत रोज अनेक ग्राहक येत असतात. परंतु, बाजारातील गर्दी पाहता प्रशासनाचे नियम कशासाठी? असा सवाल उपस्थित होतो.
दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीबाबत बाजारपेठेतील दुकानदारांना विचारणा केली असता, यावर बोलण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे या वाढत्या कोरोना स्थितीला व उद्भवणाऱ्या परिस्थितीला बाजारपेठेने किती मनावर घेतले हाच प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर या बाजारपेठेतील नागरिकांची गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंग हा शब्द फक्त नामधारीच उरला की काय? असेही म्हणता येईल अशी स्थिती आहे. कॉटन मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचे काम नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे आहे. मात्र, त्यांच्या कार्यालयात याबाबत विचारणा केली असता कोणतेही उत्तर मिळाले नाही.
विशेष म्हणजे सर्वात मोठी बाजारपेठ असणारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा थर्मल स्क्रिनिंग केली जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्याच्या माध्यमातून इतर बाजारपेठ सुरू आहेत त्यांच्याकडूनच नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी या बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांना नाममात्र सॅनिटाईझ केल्या जात आहे. परंतु, वाहनांना सॅनिटाईझ करण्याबरोबरच येथे येणाऱ्या व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग होणे तितकेच आवश्यक आहे, तर दुसरीकडे या बाजारपेठेतून भाजीपाला घेऊन जाणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी मात्र बाजारपेठेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहे. बाजारपेठेत स्वच्छता नसल्याने त्या बाबींची आम्हालाही भीती वाटते. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी लहान भाजी विक्रेत्यांकडून केल्या जात आहे, तर ग्राहकांनी देखील या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत काळजी वाटत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शासनाचे मार्गदर्शक तत्व व नियम फक्त कागदावरच राबविल्या जात आहे का? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहे.