नागपूर - कोरोनाबाधित रुग्णांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची एक्स रे आणि सीबीनॅटद्वारे तपासणीकरून निदान केले जाणार आहे. महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी याबाबत माहिती दिली.
क्षयरोग आणि कोरोना द्विदिशात्मक तपासणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण विभागाकडून दिल्या आहेत. सारी अथवा आयएलआय रुग्णांचीही क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सारी व आयएलआयच्या २२१ रुग्णांमधून ११ रुग्णांना क्षयरोगाचे निदान झाले आहे. तीव्र श्वसन संक्रमण आजार, सारी व इन्फ्लुएंझासारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी एक्स रे व सीबीनॅटद्वारे होणार आहे.
काही दिवसांपूर्वी चाचणी केलेल्या कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण ०.३७ ते ४.४७ टक्के असल्याचे आढळले. त्यामुळे क्षयरोग आणि कोविड या दोन्ही समस्यांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. मेडिकल, मेयो व सदर बाजार रुग्णालय येथे ही तपासणी सुविधा आहे. याचा रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.