नागपूर - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी तब्बल 44 रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा नागपुरात शिरकाव झाल्यापासून एकाच दिवशी इतका मोठा आकडा वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 206 वर जाऊन पोहोचला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळत असताना केवळ 24 तासात नागपुरात 44 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू देखील झाल्याची माहिती आहे. नव्या 44 बाधितांमुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 206 वर पोहचली आहे. ज्या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा कनेक्शन असल्याने प्रशासनाने आधीच विलगीकरण केल्याची माहिती आहे. नागपुरात सतरंजीपुरा, मोमीनपुरा या हॉटस्पॉटनंतर आता आणखी एकदा नवीन हॉटस्पॉट तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्या रुग्णाचा काल मृत्यू झाला, तो दक्षिण-पश्चिम नागपूरच्या पार्वतीनगर परिसरात राहायचा. त्यामुळे तो राहत असलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
या मृत तरुणाला मधुमेहाचा त्रास असून गेल्या काही दिवसांपासून त्याला सर्दी, खोकला व ताप देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रुग्ण या नव्या परिसरात सापडल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे तो कुणाच्या संपर्कात आल्याने त्या तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला याचा तपास प्रशासन करीत आहे.