नागपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून देशभरातील मंदिर कुलूप बंद करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात देव या बंधनातून मुक्तह होतील. मात्र, कोरोनाचा संसर्ग अद्याप आटोक्यात आला नाही. तरी देखील भाविकांमधून मंदिर उघडण्याची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत मंदिर सुरू केल्यास संसर्गाचा धोका कायम असणार आहे. मंदिरात येणारा प्रत्येक भाविक मोठ्या श्रद्धेने देवळातील घंटा वाजवतोच, त्याचवेळी घंटेला होणारा स्पर्श टाळण्यासाठी नागपुरातील प्राध्यापक निखिल मानकर यांनी टच-फ्री घंटी वाजेल अशी सिस्टम डेव्हलप केली आहे. केवळ २५० रुपये खर्च करून आणि घरघुती जुगाडच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेल्या या उपकरणामुळे कोरोनाच्या संसर्ग होण्याचा धोका कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे
कोरोना महामारीचे संकट आल्यापासून आपल्या देशातील शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आदर्श विद्यालयात आणि स्वर्गीय आनंदराव पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्राध्यापक असलेले निखिल मानकर यांना नव-नवीन प्रयोग करण्याची आवड आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देताना समाज उपयोगी असे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मानकर यांचा नेहमीच पुढाकार असतो. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी केवळ दीडशे रुपये खर्च करून हँड सॅनिटाइझर मशीन तयार केले होते. यावेळी त्यांनी अवघे २५० रुपये खर्च करून स्पर्श न करता वाजवता येणारी मंदिरातील घंटा तयार केली आहे. या ही प्रयोगात टाकाऊ ते टिकाऊ या नियमाचे पालन करत प्राध्यापक निखिल मानकर यांनी हा आविष्कार केला आहे.
: