नागपूर - हिंगोली सारख्या मागास भागातून काँग्रेस पक्षाचा एक युवा कार्यकर्ता म्हणून, राजकारणाची सुरूवात करणाऱ्या, काँग्रेसचे सरचिटणीस तथा खासदार राजीव सातव यांनी अवघ्या काही वर्षांतच आपली देश पातळीवर एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे युवा नेतृत्व हरवले आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'बोलण्यात कायम नम्रता'
अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये काम करताना, राजीव सातव यांच्याशी माझा नेहमीच संवाद राहिला आहे. त्यांच्या बोलण्यात कायम नम्रता, चेहऱ्यावर हास्य असायचे. आमदार, खासदार व काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये सरचिटणीस आणि गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून, प्रामाणिकपणे काम करणारा एक दूरदृष्टीचा युवा नेता काँग्रेस पक्षाने गमावला आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका बजावण्याची क्षमता असलेले महाराष्ट्रातील हे नेतृत्व काळाने आमच्यातून हिरावून घेतले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
'संघटन कौशल्य असलेला नेता'
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचा विश्वास संपादन करून, त्या विश्वासाला कामाची जोड देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच २०१७मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही गुजरातसारख्या राज्यात संघटन उभारून, काँग्रेसचे पुनरागमन करण्याचे काम त्यांनी करून दाखवले. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात राजीव सातव यांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा होता.
'पक्षाप्रती निष्ठा होती'
सातव यांनी स्वतःपेक्षा काँग्रेस पक्षाला अधिक महत्व देत, पक्षाची सेवा केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. यात राजीव सातव यांचा समावेश होता. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी २०१९मध्ये निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाप्रती असलेली ही निष्ठा त्यांचे वेगळेपण दाखवणारी होती. काँग्रेस पक्षाने एक उमेद व उज्ज्वल भविष्य असणारा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने दु:ख झाले असून, आपण नि:शब्द झाल्याची भावना, डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्ती केली.
हेही वाचा - काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन