नागपूर - 'भाजपचा झेंडा दिसला तर घरात घुसून मारु’ अशी धमकी सावनेर-कळमेश्वरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली. भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सुनील केदार यांचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे.
हेही वाचा- समाजातील दुःख घेऊन जा, नागपुरमधील महिलांचे बाप्पाला साकडे
जिल्ह्यातील सिल्लेवाडा गावात गुरुवारी स्टार बसचा शुभारंभ कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आणि आमदार सुनिल केदार यांच्यात शाब्दिक वाद झाला. यांच्या वादात नंतर कार्यकर्त्यांनी उडी घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. कार्यकर्त्यांच्या वादानंतर सुनिल केदारांनी भाषण दिले. त्यात 'भाजपचा झेंडा दिसला तर घरात घुसून मारु' अशी धमकी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली. तसेच 'दुध मांगोगे तो खीर देंगे, नही तो दिन में तारे दिखा दुंगा' असाही इशारा दिला. केदार-पोतदार वादाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वादाचे नेमके कारण कळू शकले नाही.