नागपूर : कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोवरून उसळलेल्या हिंसाचारावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार जातीय तेढ निर्माण करून फुले, आंबेडकर यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारला कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर त्यांनी तात्काळ पायउतार व्हावे, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
कोल्हापुरातील हिंसाचाराचा बोलावता धनी कोण? : नाना पटोले म्हणाले की, 'कोल्हापूरमध्ये दोन मुलांनी औरंगजेबाचा डीपी ठेवला होता. याला मुस्लिम समाजाने विरोध केला असून त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांनी यावर कारवाई केली, मात्र महाराष्ट्रातील काही संघटनांनी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. अशा घटना थांबवण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र हे सरकार असे जाणीवपूर्वक करत आहे का?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूरात झालेल्या हिंसाचारामागील बोलविता धनी कोण हे उघड झाले पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रात दलित, मुस्लिम आदिवासी, हिंदू कोणीही सुरक्षित नाही असेही ते यावेळी म्हणाले.
'तर जनता तुम्हाला रस्त्यावरही फिरू देणार नाही' : नुकतीच मुंबईच्या सावित्रीबाई फुले वसतीगृहात विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. जनता उत्तर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यकर्ते म्हणून तुम्हाला वावरता येणार नाही. नाहीतर जनता तुम्हाला रस्त्यावरही फिरू देणार नाही, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
'शरद पवारांच्या भूमिकेचे स्वागत' : महाविकास आघाडीच्या पक्षांनी पायात पाय घालून पडण्यापेक्षा जिथे जो पक्ष मजबूत आहे ती जागा त्याला सोडण्याची तयारी दाखवली तर राज्यात सत्तांतर शक्य आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'ही भूमिका महाराष्ट्रात पहिले काँग्रेसनेच मांडली आहे. शरद पवार आता असे बोलले आहेत. त्यावेळी आम्ही हेच सांगितले होते की मेरिटच्या आधारे निर्णय घेऊ आणि भाजपला राज्यातून बाहेर काढू. शरद पवार आता असे म्हणत आहेत याचे आम्ही स्वागत करतो.'
हेही वाचा :