नागपूर - देशाला या अवस्थेत पोहचवण्यात केवळ काँग्रेस आणि त्यांचे नेतेच जबाबदार असल्याचा आरोप, एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी केला. एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा मध्य नागपूरच्या मोमीनपूर येथे पार पडली. या सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
भाजप आणि मोदींना सत्तेत आणण्यात काँग्रेसची मोठी भूमिका आहे. काँग्रेस मरणासन्न अवस्थेत पोहचली असून जगातील कोणत्याही डॉक्टरांचे औषध आता काँग्रेसमध्ये शक्तीचा संचार करू शकत नाही, असे ओवेसी म्हणाले.
हेही वाचा - करून गेलं गाव अन् भलत्याचं नाव, अशी सध्याची भाजपची अवस्था - पवार
काँग्रेस पक्ष म्हणजे समुद्रात बुडत असलेले जहाज आहे. हे जहाज बुडत असताना त्याचा कॅप्टनच सर्वात आधी पळून गेल्याची टीका ओवेसी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली. आमच्या पक्षाने उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन होत आल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. देशात विरोधकच सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाले आहेत. अशा परिस्थितीत एमआयएम एक सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडत आहे, असे भूमिका ओवेसी यांनी मांडली. नागपूर शहरातील मध्य आणि उत्तर नागपूर मतदारसंघात एमआयएमने आपले दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत.