नागपूर Congress Foundation Day : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस आजपासून सुरुवात करणार आहे. कॉंग्रेस पक्ष आपल्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर शहरात 'है तयार हम' या सभेनं त्याची सुरुवात करणार आहे. देशातील जनतेसाठी हा ऐतिहासिक क्षण असेल. भाजपला केंद्रातील सत्तेतून पराभूत करण्यासाठी पक्ष परिवर्तनाचा संदेश देईल, असं कार्यक्रमस्थळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
- कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते करणार सभेला संबोधित : पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसंच राहुल गांधी या सभेला संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) मुख्यालय आणि ऐतिहासिक 'दीक्षाभूमी' असलेल्या नागपुरात ही सभा होत असल्यानं याचं महत्त्व आणखी वाढलंय.
काय म्हणाले नितीन राऊत : या सभेविषयी बोलताना नागपूरचे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी मंगळवारी सांगितलं की, 'पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस रणशिंग फुंकेल. तसंच 'है तयार हम' ही संकल्पना असलेली ही सभा संपूर्ण देशाला चांगला संदेश देईल. देशाची लोकशाही व्यवस्था, राज्यघटना तसंच लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत. या व्यवस्था अबाधित ठेवण्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे.
अहंकारी सरकार पाडण्याची शपथ घेणार : या सभेपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गुरुवारी नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनी भारतीय जनता पक्षाचे अत्याचारी आणि अहंकारी सरकार पाडण्याची शपथ घेऊन परिवर्तनाचा संदेश दिला जाईल. हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे जुलमी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडलं. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. आज पुन्हा याच महाराष्ट्रातून देश वाचवण्याची लढाई सुरु होत आहे. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेत जवाहरलाल नेहरुंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांनीच भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवानं गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं देशाची अधोगती केली आहे. जाती-धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करुन देशाला अधोगतीकडे नेत आहेत. भाजप विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि आयकर विभागाचा गैरवापर करत असल्याचंही पटोले यावेळी म्हणाले.
हेही वाचा :