नागपूर - महापौर संदीप जोशी आणि भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनीट्रॅपमध्ये फसवण्याबाबतच्या संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लीप प्रकरणी नगरसेवक तिवारी यांनी नागपूर तहसील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या क्लीपमध्ये महापालिकेतून निलंबित करण्यात आलेले डॉ. गंटावार यांचे नाव अनेकवेळा आले आहे. त्यांच्याविरोधात सभागृहात आपण अनेक पुरावे सादर केले होते. याचे स्मरण करून देताना, तिवारी यांनी यामागील सूत्रधाराला लवकर छडा लावण्याची मागणी केली आहे.
कथित ऑडिओ क्लीपच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवले आहे. समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लीपमध्ये नागपूरचे महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याबाबतचे संभाषण आहे. याशिवायही दोन जणांच्या संभाषणाच्या या ऑडीओ क्लीपमध्ये अनेकांची नावे घेण्यात आली आहे.
ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यापासून नागपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महापौर आणि नगरसेवक तिवारी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचे षडयंत्र कुणी रचले? संभाषण करणारे दोन व्यक्ती कोण? यामागे मुख्य सुत्रधार कोण? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.