नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणांमध्ये वर्चस्वाच्या वादातून प्रविण कुमार (नाव बदलेलं आहे) या 17 वर्षीय तरुणची निर्घृण हत्या झाली आहे. सौरभ उर्फ बादशाह पंधरामसह (19) सहा अल्पवयीन तरुणांनी मिळून त्याची हत्या केल्याची बाब तपासात समोर आली आहे. हिंगणा येथील एका महाविद्यालयात अल्पवयीन तरुणांचे अनके गट आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच दोन ग्रुपमध्ये संघर्ष होऊन तरुणाची हत्या झाली. हिंगणा पोलिसांनी मुख्य आरोपीसह 6 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. (College youth killed in Hingana)
सात जणांनी केली हत्या : हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ उर्फ बादशाह पंधराम (19) हा हिंगणा येथील एका महाविद्यालयात जाऊन भाईगिरी करत होता. तर, मृतक प्रविण कुमार हा बुटीबोरी येथील एका पीयुसी सेंटरवर काम करायचा. हिंगणा तसंच बुटीबोरी येथील दोन महाविद्यालयाच्या मुलांचं काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या प्रविण कुमारवर आरोपी सौरभ उर्फ बादशाहनं सहा अल्पवयीन मुलांच्या मदतीनं हल्ला केला. आरोपींनी प्रविण कुमारवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळं प्रविण कुमारचा रुग्णालयात आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हत्येच्या घटनेमागील पार्श्वभूमी : हिंगणा परिसरातील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरुणांचं बुटीबोरी येथील एक कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत भांडण झालं होतं. बुटीबोरीच्या मुलांनी हिंगणा येथील विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली होती. ही बाब आरोपी सौरभला समजली होती. त्यानं काही अल्पवयीन तरुणांच्या मदतीनं बुटीबोरी येथील विद्यार्थ्यांना मारलं. त्यामुळं दोन्ही गटात हल्ला-प्रतिहल्ला सुरू झाला. दोन गटातील काही अल्पवयीन तरुणांनी वादावर समझोता करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही गटांनी काल एका ठिकाणी भेटण्याचं ठरलं होतं.
प्रविण कुमारचा बळी : बुटीबोरीच्या विद्यार्थ्यांनी प्रविण कुमारला फिरायला जाऊ असं सांगून सोबत घेतलं होतं. त्याला दोन गटातील भांडणाची पुसटशी कल्पनाही नसल्यानं तो त्यांच्यासोबत गेला. जेव्हा दोनही गट समोरासमोर आले, तेव्हा त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. एकमेकांवर हल्ला प्रतिहल्ला सुरू असताना बुटीबोरी येथील विद्यार्थी पळून गेले. तेव्हा त्यांच्यासोबत आलेला प्रविण कुमार हा हिंगणा येथील मुलांच्या हाती लागला. आरोपींनी त्याच्यावर धारधार शस्त्र, दंडुक्यांनी वार केले. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.
पाच अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात : हिंगणा पोलिसांनी प्रवीण कुमारच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सौरभसह पाच अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा -