नागपूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भारतीय जनता पक्षात येण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यातील निवडक लोकांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ज्यांच्या ईडी किंवा इतर चौकशा सुरू आहेत अशांना आम्ही प्रवेश देणार नाही. आम्हला अशा लोकांची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कुणाला पक्षात या असे म्हणायची वेळ भाजपवर आलेली नाही. तसेच कोणाच्याही मागे धावण्याची गरज राहिली नाही. लोकच भाजपच्या मागे येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवारांनी आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावे
भाजपने गेल्या 5 वर्षात कधीही दबावाच राजकारण केले नाही. अनेक साखर कारखाने ज्यावेळी अडचणीत होते, त्यावेळी सरकार आणि राज्य बँकेच्या माध्यमातून त्यांना मदत केली आहे. कोणालाही पक्षामध्ये या असे कधीही म्हणालो नाही. यादी खूप मोठी आहे, त्यामुळे पवार साहेबांनी आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.