नागपूर - नागपूर जिल्ह्यात आजपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी या वर्गाच्या प्राथमिक शाळेला (School Reopen in Nagpur Rural area) सुरूवात झाली आहे. तब्बल 19 महिन्याने प्राथमिक शाळेचे दार खुले झाले आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून घरात असणाऱ्या मुलांना शाळेचा पहिला दिवस असल्याने चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला आहे. याचा आढावा नागपूरच्या ग्रामीण भागातील बेसा या जिल्हा परिषद शाळेतून प्रतिनिधींनी घेतलाय...
- नागपूरच्या ग्रामीण भागात शाळा सुरू -
नागपूर जिल्ह्यात आजपासून जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विमला राव यांनी घेतला. त्यामुळे नागपूर जिल्ह्यामधील सुमारे 148 शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे मार्च 2020 मध्ये शाळा बंद करण्याची वेळ आली होती. यात मध्यंतरी काही प्रमाणात मोठ्या मुलांच्या शाळा आणि कॉलेज सुरू झाले. पण कोरोनाचा धोका पाहता लहान मुलांसाठी वॅक्सिन नसल्याने शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.

1 डिसेंबर म्हणजेच आजपासून 1 ते 4 वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर ग्रामीणमधील बेसा शाळेत मुलांचे हात सॅनिटाईज तसेच थर्मल स्कॅनिंग करून त्यांना फुल आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांनी मास्क घातलेले दिसून आले. विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर ठेवून वर्गात बसवण्यात आले. शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक सविता राऊळकर यांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला.
- लहान मुलं सर्वच ठिकाणी जात आहेत, मग शाळेत का नाही?
आजच्या घडीला सर्वच कार्यक्रम असो की लग्न समारंभात मुलं पालकांसोबत जात आहेत. मग शाळेत यायला काही हरकत नसावी म्हणत निणयाचे स्वागत केले. यासोबतच ऑनलाइन शिक्षण देताना ज्या मुलांकडे मोबाईल नसल्याने त्याना मात्र याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनाही ऑफलाइन घरोघरीं जाऊन अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका देऊन पालकांना सांगून शिकवण्यासाठी मार्गदर्शन केले. पण असे असले तरी प्रत्यक्ष शाळेत आल्याने मुलांना त्याचे मित्र भेटून आनंद झाला. याचा फायदा मुलांना होणार आहे.

- शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आनंदात -
यात तिसऱ्या वर्गात शिकणारा अमित हा सामान्य कुटुंबातील असून, आज शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदी पाहायला मिळाला. आज त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता शाळेत अभ्यास करणार असल्याचे तो सांगतो.
इयत्ता पाचवीचे वर्ग ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर पाचव्या वर्गात शिकणारी खुशी ही सुद्धा शाळेत आली आहे. यावेळी तिने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असताना मराठीमध्ये पाठांतर केलेली कवितासुद्धा म्हणून दाखवली.
- नागपूर ग्रामीणमधील शाळेची परिस्थिती -
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये 114 जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यामध्ये 3506 ही पटसंख्या वर्ग 1 ते 4 मध्ये आहे. यासोबतच नगरपरिषदेच्या 8 शाळांमध्ये 396 विद्यार्थी आहेत. खासगी 5 अनुदानित शाळांमध्ये 311 विद्यार्थी आहेत. समाजकल्याण विभागाच्या 1 आणि विनाअनुदानित शाळांमध्ये 948 विद्यार्थी आहेत. 2 आदिवासी आश्रम शाळेत 229 विद्यार्थी असून, एकूण 148 शाळांमध्ये 6116 विद्यार्थी पटसंख्या आहे. दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसीकडून लहान मुलांना वही, पेन्सिल, रंगकाड्या, मास्कचे किट वाटप करण्यात आले.