नागपूर- राज्यसरकारने महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवला आहे. सुमारे सात महिन्यांपूर्वी नागपूर शहरात राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेश सुरू होते. त्यावेळी संदीप जोशी यांच्या वाहनावर वर्धा मार्गावरील आउटर रिंगरोड येथे गोळीबार झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण नागपूरच्या गुन्हे शाखे कडे सोपवले होते. मात्र, सात महिन्यात काहीही निष्पन्न झाले नसल्याने आता महापौरांवर झालेल्या गोळीबाराचा तपास सीआयडी करणार आहे.
हा संपूर्ण घटनाक्रम १७ डिसेंबर २०१९ च्या रात्री घडला होता. संदीप जोशी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जामठा भागातील एका हॉटेल मध्ये कुटुंबातील सदस्यांकरता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते घरी परतत असताना दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोन युवकांनी महापौर जोशी यांच्या कारवर गोळीबार केला. ज्यावेळी ही घटना घडली होती, त्यावेळी संदीप जोशी स्वतः कार चालवत होते, तर त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या गाडीत होते.
हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात चार गोळ्या संदीप जोशीं यांच्या कारच्या आत घुसल्या. अचानक झालेल्या गोळीबाराने जोशी यांच्या सोबतची वाहने लगेच थांबली. मात्र, तोपर्यंत दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीने पळून गेले होते.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. मात्र, सात महिन्यात पोलीस आरोपींचा शोध लावू शकले नाहीत. त्यामुळे महापौरांवर झालेला गोळीबार खरा की खोटा अशा प्रकारच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या, त्या अनुषंगाने आता गृहमंत्रालयाने ही जबाबदारी सीआयडीकडे सोपवली आहे.