नागपूर - बाल संरक्षण पथकाच्या तत्परतेमुळे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील पिटेसूर गावात जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
नातेवाईकांचे समुपदेशन -
पिटेसूर गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती बाल संरक्षण अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर बाल संरक्षण पथक पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांसह पिटेसूर गावात विवाहस्थळी पोहोचले. घटनास्थळावर नातेवाईकांनी पथकाशी वाद घातला. मात्र, 18 वर्षाखालील मुलीचा विवाह करणे बेकायदेशीर असल्याची समज देऊन नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले.
अल्पवयीन मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिचा विवाह करण्याची शंका उत्पन्न झाल्याने त्या मुलीची राहण्याची व्यवस्था बालगृहात करण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात बाल संरक्षण पथकाला तब्बल नऊ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
हेही वाचा - दुचाकी अन् सिलेंडरला फासावर लटकवत श्राद्ध घालून दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन
आई वडिलांकडून लिहून घेतले प्रतिज्ञापत्र -
या अल्पवयीन मुलीची राहण्याची व्यवस्था बालगृहात करण्यात आली आहे. तरी भविष्यात असा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आई वडिलांना समज देत मुलगी १८ वर्षाची झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले.