नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवणार, याची गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरु होती. मात्र, आता चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण, मुख्यमंत्र्यांनी स्वतः दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्गात, ते दक्षिण-पश्चिममधून निवडणूक वाढणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी 90 हजार मतांची आघाडी घेण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना दिले आहे.
एकीकडे भाजप आपल्या मतदारसंघासाठी जागा सुनिश्चित करत आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना नागपूरच्या 6 जागांसाठी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मुख्यमंत्री कोणाचाही असू द्या. मात्र, नागपुरातील 6 जागा शिवसेनाच लढवणार, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजप-सेनेची युती होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.