नागपूर - नागपूर माझ्या नसा-नसांत भिनले आहे, नागपूर शहर माझ्या अस्तित्वाचा भाग असल्याचे भावोद्गार देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काढले आहे. ते आज (दि. 18 जाने.) नागपूर येथे महानगर पालिकेतर्फे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश रवी देशपांडे, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हेही वाचा - ...अन् साहेबरावने काढून फेकला कृत्रिम पंजा
एखाद्या व्यक्तीवर झालेल्या चांगल्या संस्कारामुळे तो देशात आणि परदेशात नाव कमावतो. तो व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचताना त्याच्या यशात त्याच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीचा मोलाचा वाटा असतो. त्याच प्रमाणे मला घडवण्यात नागपूरचे योगदान महत्वाचे राहिले आहे. माझ्यावर नागपुरात संस्कार झाले. याचा मला सार्थ अभिमान असल्याच्या भावना भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रपतींनी नवी दिल्लीत मला सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. मात्र, नागपूरकरांचे प्रेम पाहून मी कृतार्थ झालो आहे. आज मला खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश झाल्याचे वाटते आहे, असे गौरवोद्गार भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काढले.
हेही वाचा - नागपूर जिल्हा परिषद : अध्यक्षपदी रश्मी बर्वे, उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारेंची बिनविरोध निवड