नागपूर - भारतीय जनता पक्षातील विदर्भातील मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मी भारतीय जनता पक्षाचा 1992 पासूनचा सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कोणी कितीही ऑफर दिल्या किंवा कोणी कितीही गळाला लावण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे सांगितले आहे. ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी आतापर्यंत पक्षात भरपूर मानसन्मान दिला आहे. त्यामुळे मी कुठेही जाणार नाही. शिवाय कुणाकडूनही काही ऑफर नसल्याचे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसच 'मुख्यमंत्री' होतील - नितीन गडकरी
विदर्भातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात शिवसेना असून त्या नेत्याला मोठ्या पदाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. भाजपचे हे मोठे नेते बावनकुळे असल्याची चर्चा होती. यावर बावनकुळे यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
हेही वाचा - सत्तासंघर्षाचा तिढा सोडविण्यासाठी मोहन भागवत मध्यस्थी करणार?
भाजपच्या कोअर कमिटीचे नेते सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत राज्याचा यशस्वीपणे कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक काळातच जाहीर केले होते. त्यामुळे युतीच्या नैसर्गिक न्यायाप्रमाणे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी बावनकुळे यांचे नाव आघाडीवर असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, की 1992 पासून पक्षाने जी जबाबदारी दिली ती पूर्ण केली आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल ती संपूर्णपणे पार पाडणार.