नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील हाणामारी प्रकरणावरून राज्यात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती संभाजीनगरच्या घटनेवरून राज्य सरकारने कायदा व सुवव्यवस्था बिघडू नये म्हणून कुठलेही अनुचित कार्य करू नये, असे आवाहन नागरिकांना केले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील राज्यात दंगलीसारख्या घटना होऊ नये, यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन केले. यावरून पवारांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
काय म्हणाले बावनकुळे : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीने सर्वात आधी संजय राऊत नावाचा भोंगा सकाळी 9 वाजताच बंद करावा. सर्व पक्षांनी राज्यात दंगलीसारख्या घटना होऊ नये, यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. अशीच भूमिका इतरही विरोधी पक्षाचे नेते घेतील, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या बावनकुळेंनी व्यक्त केली आहे. पण दुर्दैवाने चंद्रकांत खैरेंसारखे ठाकरे गटाचे नेते प्रक्षोभक विधान करून आगीत तेल ओतण्याचे काम करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे : राज्यावर जेव्हा जेव्हा दंगल, बॉम्बस्फोट अशी संकटे येत असतात तेव्हा तेव्हा विरोधी पक्ष आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन संकटांचा सामना करायचा असतो. पण सध्याच्या अशा परिस्थितीत विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप करणे अत्यंत चुकीचे आहे. दंगलीत ज्या लोकांचा सहभाग आढळून येतो, अशा लोकांना किमान पाच तरी वर्षासाठी राज्य बाहेर पाठवावे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
निवडणूकीला सामोरे जाऊ : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा किंवा नाही हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
आमदारांच्या कामाचे मूल्यांकन नाही : भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय आमदारांच्या कामांचे वर्क ऑडिट केले जात असल्याची चर्चा आहे. ही चर्चा बावनकुळेंनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, आमदारांच्या कामाचा कुठलाही रिपोर्ट नाही. आमदारांना सर्व्हे रिपोर्ट तयार झाला नसून केवळ वार्षिक बैठकीत सूचना आमदारांना केल्या आहेत.
सावरकर गौरव यात्रा : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भाजप व शिंदेंची शिवसेनेतर्फे राज्यात 30 मार्च ते 6 एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्याचा उद्देश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले आहे. बावनकुळे म्हणाले की, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या दिवशी 6 एप्रिल रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे.
हेही वाचा : Kiradpura riots : राजकारण नको म्हणत त्या घटनेवरुन विरोधकांचे आरोप प्रत्यारोप