नागपूर - केंद्रीय वस्तू आणि सेवा कर ( CGST ) नागपूर झोनचे मुख्य आयुक्त अशोक (येन्नी) यांना निलंबित करण्यात आले आहे. केंद्रीय महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. एका महिला आयआरएस अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सीजीएसटी नागपूर कार्यालयात तैनात असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला मुख्य आयुक्त अशोक यांनी उद्धटपणे वागणूक दिली. ती महिला अधिकारी सहा महिन्यांपूर्वीच येथे आली आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर सीबीआय सदस्य काही दिवसांपूर्वी सीजीएसटी नागपूर कार्यालयात आले होते. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल बोर्डाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाला पाठवण्यात आला होता. त्यानंतर महसूल विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यावर गैरवर्तन आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य आयुक्त अशोक यांचे स्वीय सचिव सुशील कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
वादग्रस्त अधिकारी - सीजीएसटीचे मुख्य आयुक्त अशोक हे यापूर्वीही वादात सापडले आहेत. बंगळुरुहून नागपूरला बदली झाल्यानंतर त्यांच्यावर सुमारे 8 महिने सीजीएसटी ( CGST ) च्या गेस्ट हाऊसमध्ये राहिल्याचा आरोप होता. त्यांची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना गेस्ट हाऊस रिकामे करावे लागले होते. गेस्ट हाऊसमध्ये काही दिवसांसाठी राहण्याची सोय आहे. मात्र, त्यांनी 8 महिने गेस्ट हाऊसमध्ये राहून सरकारकडून घरभाडे भत्ता ( HRA ) वसूल केल्याचा आरोप आहे. मुख्य आयुक्तांसाठी राखीव असलेला बंगला रिकामा राहिला. हे प्रकरण शांत होताच महिला अधिकाऱ्याच्या कथित गैरवर्तन आणि लैंगिक छळामुळे विभागात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - नागपूर रेल्वे स्थानक परिसरात बॅगमध्ये आढळली जिवंत स्फोटके