नागपूर NCP Yuva Sangharsh Yatra : येथे काल युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेनंतर आंदोलकांनी राडा घातला होता. त्यावर आता नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह राड्यात सहभागी इतर नेते आणि कार्यकर्ते यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आयपीसी सेक्शन १४३ आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yuva Sangharsh Yatra Organisers)
बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा केला प्रयत्न : आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा काल समारोप झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही न आल्यानं रोहित पवार कार्यकर्त्यांसह विधानभवनाकडं निघाले होते. त्यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही कार्यकर्त्यांनी तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला होता.
काय आहे युवा संघर्ष यात्रा? युवकांचे विविध प्रश्न हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रेला सुरवात झाली होती. 25 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर असा या पदयात्रेचा कालावधी होता. युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभ म्हणून रोहित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं होतं. तसंच त्यानंतर महात्मा फुले वाडा, लाल महाल येथे अभिवादन करून या युवा संघर्ष यात्रेला सुरवात झाली होती. यावेळी लाल महाल ते टिळक स्मारकापर्यंत पायी यात्रा काढण्यात आली. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. एकूण 800 हून अधिक किमी प्रवास पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असून राज्यातील बेरोजगारीचा वाढलेला दर, परीक्षा आयोजित करण्यात होणारा विलंब, कायमस्वरूपी पदांऐवजी कंत्राटी नोकऱ्यांचा प्रसार आणि आपल्या तरुणांच्या भविष्याला गंभीरपणे धोक्यात आणणारी इतर असंख्य आव्हाने यासारख्या समस्यांबाबत युवा वर्ग व नागरिकांशी भेटून चर्चा केली जाणार आहे व त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आणि इच्छा आहेत. त्याबाबत व्यक्त होण्याची संधी त्यांना या यात्रेदरम्यान मिळणार आहे.
हेही वाचा: