नागपूर - नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डी-१ कोचमध्ये काल (1 जून) एक बेवारस काळ्या रंगाची बॅग सापडली. आरपीएफच्या पथकाने ती बॅग जप्त केली होती. आज तपासाअंती त्या बॅगमध्ये ब्राऊन शुगर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बॅगमध्ये ब्राऊन शुगरच्या छोट्या ३१० पुड्या आढळून आल्या, ज्याचे वजन २१.४९० ग्रॅम आहे. त्याची एकूण किंमत जवळपास २१ लाख ४९०० रुपये असल्याची माहिती पुढे आली आहे.
ट्रॅव्हलिंग बॅगेमध्ये आढळले ब्राऊन शुगर
आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सीताराम जाट, नविन कुमार सिंह आणि आरक्षक अजय सिंह हे फलाट क्रमांक 4 वर गस्त घालत होते. यावेळी महाराष्ट्र एक्स्प्रेस उभी होती. या गाडीच्या डी-१ कोचची तपासणी केली. त्यामध्ये रेल्वे पोलिसांना एका कोपऱ्यात काळ्या रंगाची एक ट्रॅव्हलिंग बॅग आढळून आली. त्या बॅग संदर्भात प्रवाशांकडे विचारणा केली. मात्र, कुणीही त्या बॅगेवर मालकी हक्क सांगितला नाही. त्यामुळे आरपीएफच्या पथकाने ती बॅग जप्त केली. फलाटावरील कॅमेऱ्याच्या समोर ठेवण्यात आली. ज्यावेळी ती बॅग उघडण्यात आली तेव्हा त्यामध्ये असलेल्या काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत ब्राऊन रंगाचे पावडर आढळून आले. त्यानंतर लगेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. बॅगमध्ये असलेल्या पावडरची तपासणी कारण्यात आली. तेव्हा ते ब्राऊन शुगर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - मुंबईत एनसीबीची छापेमारी; 2 आरोपींना अटक