नागपूर - शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नाल्यात 45 वर्षीय व्यक्तीचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला आहे. हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मृतकाच्या गुप्तांगाला दोरी बांधली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. बरेच प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना मृतकाची ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. गोपाल गणपतराव लंगोटे ( Gopal Ganapatrao Langote ) असे मृतक व्यक्तीचे नाव असून त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह एका कोरड्या नाल्यात ( Body Found in Dry nala pawangaon ) फेकला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनगाव ते कामठी मार्गावरील दोन शेताच्यामध्ये एक कालवा जातो. उन्हामुळे कालवा कोरडा पडला आहे. शेजारच्या गावातील नागरिक त्या भागात जनावरांना चरण्यासाठी जातात. त्यापैकी एका कोरड्या नाल्यात 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत तत्काळ कळमना पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असून मृतकाच्या गुप्तांगाला दोरी बांधलेली दिसून आले. त्यामुळे हा प्रकार वेगळा असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार : मृतकाची ओळख गोपाल गणपतराव लंगोटे, अशी पटल्यानंतर पोलिसांनी मृतकाच्या संपर्कातील काहींची चौकशी सुरू केली आहे. प्रथमदर्शनी ही हत्या वाटत असली तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरचे स्पष्ट होणार असल्याने पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.
हेही वाचा - Psycho Man Attack on Girl : मनोरुग्णाने केला विद्यार्थीनीच्या डोक्यावर हातोडीने हल्ला