नागपूर - १४ मे रोजी ब्लॅक बिट्रन नावाच्या दुर्मिळ पक्षाच्या मोडलेल्या पायावर नागपुरातील ट्रॅझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या शस्त्रक्रिये नंतर ब्लॅक बिट्रन पक्षी हळू-हळू पाय टाकायला आणि उडायला देखील शिकला. त्यानंतर त्याने अचानक आकाशात उंच अशी झेप घेत आपल्या नैसर्गिक अधिवासात परत जाण्याच्या प्रवासाला सुरवात केली.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रिकच्या ताराला स्पर्श झाल्याने ब्लॅक बिट्रन पक्षी जखमी झाला होता. ट्रॅझिट ट्रीटमेंट सेंटरला हा पक्षाची माहिती समजताच त्याला उपचारासाठी सेंटरला आणण्यात आले. त्या पक्षाच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला तेव्हा त्याच्या एका पायाचे हाड मोडल्याचे निदान होताच डॉ. मयूर काटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या ब्लॅक बिट्रन पक्षावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी त्याच्या पायाच्या हाडात रॉड टाकण्यात आला होता. ब्लॅक बिट्रन या पक्षाच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने काही दिवसात त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार होते. मात्र, त्याच्या आधीच ब्लॅक बिट्रन पक्षाने सर्वांच्या नजरा चुकवून आकाशात उंच झेप घेऊन आपल्या सुरक्षित अधिवासात परतला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॅक बिट्रन पक्षाने पायातील रॉड/पिन देखील काढण्याची संधी डॉक्टरांना दिली नाही.