नागपूर - राज्यात सध्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच उन्हाचा पाराही दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश्न पेटला आहे. पेंच प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असून पाणी नागपूर शहराला देवू नये, या मागणीसाठी आज भाजपच्याच आमदाराने सरकारच्या विरोधात आंदोलन करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
नागपूर शहराचे आजचे तापमान ४५ अंशापेक्षा जास्त होते. अशा उन्हात शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. चौराई धरणात पाणीसाठा अडकवल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे ६०७ दलघमी पाणी अडवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तोतलाडोह प्रकल्पात पाण्याचा प्रवाह कमी झाला होता.
मध्यप्रदेशात पाऊस कमी झाल्याने चौराई धरण भरले नाही आणि त्यामुळे मध्यप्रदेशातच पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. शहराला ६१० एमएलडी पाण्याची दररोज मागणी असून पेंच प्रकल्पातून पाणी पुरविले जाते, त्यामुळे शेतकऱयांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनदेखील पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.