हैदराबाद - राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका बजावणारे एक मोठे नेतेच ओबीसी आरक्षणात झारीतील शुक्राचार्य ठरत आहे अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत केली आहे. त्यामुळे बावनकुळेंचा नेमका रोख कुणाकडे आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बावनकुळे म्हणाले, 'सरकारमधील मोठा नेता आहे. ज्यांनी हे सरकार तयार केलं त्यांना वाटतं की ओबीसींना आरक्षण मिळू नये' त्यामुळे बावनकुळेंना यातून कुणाकडे निर्देश करायचा आहे याची चर्चा आता होऊ लागली आहे. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. त्यामुळे या टीकेला आता महाविकास आघाडीकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारच्या मागे झारीतील शुक्राचार्य -
राज्य सरकारने ओबीसींचा इंपेरिकल डेटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सोपवली आहे. तीन महिन्यात त्यांना ही माहिती गोळा करायची आहे. त्यामुळे आरक्षण मिळण्यास वेग येईल का? याबाबत बावनकुळेंना विचारले असता, "सरकारच्या मनात चांगली भावना असेल तरंच कामात वेग दिसेल, मात्र तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी घेतला तर सरकारच्या मागे झारीतला शुक्राचार्य आहे, असे समजावे. या सरकारमधील मोठा नेता आहे, ज्यांनी हे सरकार तयार केलं आणि त्यांना वाटतं की ओबीसींना आरक्षण मिळू नये आणि त्यामुळेचं डेटा गोळा करण्याचे काम जाणीवपूर्वक उशीरा करतील" असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलाखतीदरम्यान केला.
... तर गावात फिरू देणार नाही -
राज्य सरकारला टाईमपास करायचा असेल आणि आरक्षण मिळू द्यायचे नसेल तर इंपेरिकल डेटा गोळा करण्यास उशीर होईल. मात्र जर सरकारला आरक्षण द्यायचे असेल तर वेळेच्या आत डेटा गोळा होईल. त्यामुळे वेळेत डेटा गोळा केला तर सरकारचे धन्यवाद मानल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा नेत्यांना गावात फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.