नागपूर - भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी सावणेरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. विधानसभेची निवडणूक तनावमुक्त वातवरणात व्हावी आणि त्यासाठी सुनील केदार यांच्या गुंडांना तडीपार केले जावे, असे निविदेन त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या शुभारंभ समारंभात पोतदार आणि केदार यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही वाद झाला. दरम्यान, भाषणात आमदार सुनील केदार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना 'हातात भाजपचा झेंडा दिसल्यास घरात घुसून मारु', अशी धमकी दिली होती. त्यामुळेच आपण केदार यांच्याविरोधात पोलीस तक्रार केली असल्याचे पोतदार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी त्रास दिल्यास भाजप कार्यकर्तेही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याप्रकरणी सुनील केदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रीया द्यायला नकार दिला आहे.