नागपूर - हिंगणा नगरपंचायतमध्ये भाजपाने सत्ता काबीज केली असून नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज (शुक्रवारी) झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी लता गौतम (पारधी), उपाध्यक्षपदी गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक अजय बुधे विजयी झाले आहेत. नगरपंचायत कार्यालयात उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी आणि मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विशेष सभेत अध्यक्ष पदाकरीता भाजपाच्या लता गौतम (पारधी) यांना 12 मते मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विशाखा राजेन्द्र लोणारे यांना 5 मते मिळाली, तर उपाध्यक्ष पदाकरीता अजय बुधे यांना 12 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादारावजी ईटनकर यांना 5 मते मिळाली.
शिवसेना नगरसेवकाचे भाजपाला मतदान
नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या एकमेव असलेल्या नगरसेवक विष्णू कोल्हे यांनीही भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले. विष्णू कोल्हे यांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर भाजपाकडे पूर्ण बहुमत झाले. प्रभागाच्या विकासासाठी सत्ता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - VIDEO : मंत्री रावसाहेब दानवेंनी घेतली रेल्वे स्थानकावर वडापावची चव; पाहा, पुढे काय घडलं?