नागपूर - वाढत्या कोरोना रुग्णांमुळे नागपूर मनपा आयुक्तांनी विद्यापीठाला परीक्षा रद्द करण्याचा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित बीएडच्या पहिल्या सत्राचा पेपर ऐन वेळेवर रद्द करण्यात आला. पूर्व विदर्भातील 1700 विद्यार्थांना या परीक्षा रद्दच्या करण्याच्या निर्णयाचा फटका बसला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचून परतावे लागले. शिवाय शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.
ऑक्टोबर 2019 मध्ये तांत्रिक कारणाने परीक्षा रद्द -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने कोरोनामुळे रखडलेली बीएड हिवाळी 2019 च्या पहिल्या सेमीस्टरची परीक्षा 22 फेब्रुवारीरोजी घेण्यात आली. तसेच 24 फेब्रुवारीरोजी दुसरा पेपर होता. ऑक्टोबर 2019 मध्ये तांत्रिक कारणाने नंतर लॉकडाऊनमुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे 22 आणि 24 फेब्रुवारीरोजी या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. 2019-20 च्या सत्रातील विद्यार्थ्यांचा एक पेपर मार्च 2020 मध्ये झाला. परंतु लॉकडाऊन लागल्याने इतर पेपर पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाने पुन्हा परीक्षेचे नियोजन केले. सोमवारी म्हणजेच २२ फेब्रुवारीरोजी एक पेपरही झाला. बुधवारी दुसरा पेपर असताना नागपूर आयुक्तांनी नागपूरात वाढती रुग्णसंख्या पाहता सर्व परीक्षा रद्द करण्याचा सूचना दुपारी नागपूर विद्यापीठाला दिल्या. त्यामुळे एन वेळेवर 13 परीक्षा केंद्रांना यासंदर्भात माहिती देण्यात आली.
पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांत होती परीक्षा -
वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा अशा चार जिल्ह्यांत 13 केंद्रावर 1700 विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन केले होते. अनेक परीक्षार्थी बाहेर जिल्ह्यातून केंद्रावर पोहचले होते. परंतु परीक्षा केंद्रावर लावण्यात आली सूचना बघून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आतापर्यंत पाचव्यांदा परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षेसाठी अपात्र ठरणार असल्याने जीव टांगणीला -
कोरोनामुळे ही परीक्षा पाच वेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच नौकरीसाठी अनेक अडचणींना समोर जात असताना बीएड ही पात्रता असणाऱ्या पदांच्या स्पर्धा परीक्षा कशा द्यायच्या, असा प्रश्नही या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
यावर काय म्हणाले कुलुगुरू -
2019 च्या सत्रात प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर मार्च 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला बीएडच्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने ती रद्द करण्यात आली. परिणामी विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रात प्रवेश दिला असला, तरी पहिल्या सत्राची मार्कशीट नसल्याने दुसरी मार्कशीट बनण्यास अडचण समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्कॉलशिप मिळण्यासाठीही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर परीक्षेचे नियोजन करणार असल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांची काय मागणी -
विद्यापीठाच्यावतीने अनेक परीक्षा ऑनलाईन घेतल्या जात आहेत. मग बीएडच्या विद्यार्थ्यांची फरफट कशासाठी, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहे. विद्यापीठाने याकडे लक्ष देत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच पुढील सत्रात समाविष्ट करावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
हेही वाचा - पतीला पत्नीने चहा बनविण्यास नकार देणे ही गंभीर घटना नाही - उच्च न्यायालय