नागपूर - शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या फुटाळा तलावाकडे नागपूरकरांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते अद्यापही पूर्ण झाले नाही. शिवाय या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे परिसरात सर्वत्र धुळीचे साम्राज आहे. त्यामुळे येथे विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सकाळ आणि संध्याकाळ आपला निवांत वेळ घालवण्यासाठी नागपूरकरांकडून फुटाळ्याला पसंती दिली जाते. शिवाय तलावाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी देखील नागपूरकरांबरोबरच इतरही नागरिक फुटाळा तलावावर येत असतात. मात्र, काही महिन्यापासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तलावाच्या चौपाटीचे रूप बदलले आहे. शिवाय सौंदर्यीकरणाचे काम सुरू असल्याने परिसरात सर्वत्र धूळ पसरत असल्याचे चित्र आहे. म्हणूनच नागरिक येथे येणे टाळत असल्याचे पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून तलावाचे काम लॉकडाऊननंतर काही दिवसातच पूर्ण होणार, असे सांगण्यात आले होते. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय हा परिसर रहदारीचा असल्याने आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सौंदर्यीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार?
रात्रीच्या वेळी धुळीमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वीच पालकमंत्री नितिन राऊत यांच्याकडून फुटाळा तलावावर 'बुद्धीष्ट थिम पार्क' होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याही बाबीची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या संथ कामामुळे परिसरातील व तलावावर येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे सौंदर्यीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या बाबत प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. अशावेळी फुटाळा तलाव कधीपर्यंत पूर्णतः नागरिकांना पुन्हा अनुभवता येईल, हे सांगता येणे सध्यातरी कठीणच दिसत आहे.