नागपूर - बालभवन दिल्लीकडून दिला जाणारा मानाचा समजला जाणारा बालश्री पुरस्कार नागपूर शहरातील ताराबाई शंगरपवार बालभवन (परांजपे शाळा) येथील विद्यार्थिनीला प्राप्त झाला आहे. मनोज्ञा श्रीपाद वैद्य असे पुरस्कार विजयी विद्यार्थिनीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी मनोज्ञा दहाव्या वर्गात शिकत होती, त्यावेळी ती या स्पर्धेत सहभागी होती, ज्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आता मनोज्ञा १२ उत्तीर्ण झाली आहे.
'क्रिएटिव्ह सायन्स इनोव्हेशन' विषयात यंदा बालश्री पुरस्कार मिळवणारी मनोज्ञा भारतात एकमेव ठरली आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिला हा पुरस्कार पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून स्वीकार करावा लागला. अन्यथा दरवर्षी या पुरस्कारांचे वितरण महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते केले जाते. सर्वात विशेष म्हणजे मनोज्ञाला २०१६ साली दोन राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
मनोज्ञाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यावेळी तिला वॉटर स्काय सिटी, कचरा व्यवस्थापन या विषयांवर आपले संशोधन सादर करण्याची संधी मिळाली होती, महत्त्वाचे म्हणजे त्या कॅम्पमध्ये सहभागी स्पर्धकांना ताबडतोब आपला प्रकल्प सादर करावा लागतो. दिलेल्या विषयाकडे स्पर्धकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, दिलेला विषय (टास्क) सोडवताना नाविन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब करण्यात आला किंवा नाही हे देखील तपासले जाते. याच दरम्यान परीक्षकांकडून स्पर्धकांची मुलखात घेतली जाते आणि मानसशास्त्रीय चाचणी देखील घेतली जाते, यासर्व परीक्षा पास करून मनोज्ञाने वैज्ञानिक दृष्टीकोनातून समस्या सोडवत क्रिएटिव्ह सायन्स इनोव्हेशन विषयात बालश्री पुरस्कार मिळवला आहे.
अशी होती परीक्षा
बालश्री पुरस्कार निवड प्रक्रिया तीन स्तरावर घेण्यात आली होती. यामध्ये जिल्हास्तरीय चाचणी, राज्यस्तर चाचणी आणि राष्ट्रीय स्तर चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये क्रिएटिव्ह परफॉर्मन्स, क्रिएटिव्ह आर्टस्, क्रिएटिव्ह रायटिंग आणि क्रिएटिव्ह साइंटिफिक इनोव्हेशन या चार भागात परीक्षा विभागण्यात येते. या पैकी क्रिएटिव्ह साइंटिफिक इनोव्हेशन या विषयात नागपूरच्या मनोज्ञाला बालश्री पुरस्कार मिळाला.
बालभवन संदर्भात माहिती
स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात लहान मुलांचे 'चाचा नेहरू' यांच्या संकल्पनेतून बालभवनची निर्मिती दिल्ली येथे करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रादेशिक स्तरावर देखील केंद्र सुरू झालेली आहेत. बालभवन ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. राष्ट्रीय बालभवन एक अशी संस्था आहे यामध्ये लहान मुलांच्या आवडीनुसार आणि योग्यतेनुसार त्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देताना बालभवन ही संस्था व्यासपीठदेखील उपलब्ध करून देते. या संस्थेत मुलांना नवीन गोष्टी शिकण्याच्या अमर्यादित संधी उपलब्ध होतात. विविध शाळेत शिकणारे विद्यार्थी रोज संध्याकाळी बाल भवनच्या केंद्रात एकत्र येतात. त्यातून त्यांच्यातील गुण ओळखले जातात. संपूर्ण विदर्भात केवळ नागपूरच्या परांजपे शाळेत ताराबाई शंगरपवार बालभवन नावाने केंद्र सुरू आहे.