नागपूर - यात्रा कोणीही काढली तर विजय महाविकास आघाडी सरकारचाच होणार याची खात्री असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ते नागपूरत विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीला याचा काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.
'आघाडी सरकारचे काम राज्यालाच नव्हे, तर देशाला आवडले'
'महाविकास आघाडी सरकारला लवकरच 2 वर्षे पूर्ण होत आहेत. आता महाविकास आघाडीचे राज्यालाच नाही तर देशाला काम आवडले आहे. यामुळे भाजप महाराष्ट्रात विरोधात असल्याने विरोधी पक्ष म्हणून यात्रा काढने त्यांचे काम आहे. राज्याचे सर्वोत्तम काम असणाऱ्या चार राज्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव म्हणजेच महाविकास आघाडीचे काम आहे', असे थोरात म्हणाले.
ठाकरे स्मृतीस्थळ शुद्धीकरणावर बोलणे टाळले
मुंबईच्या शिवाजी पार्क येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही विजयी होण्यासाठी आलो, असे म्हणत जन आशीर्वाद यात्रेला सुरवात केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. मात्र, यानंतर शिवसैनिकांनी दूध आणि गोमुत्र टाकून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. यावर बोलताना थोरात म्हणाले, की 'बाळासाहेब आदरणीय आहेत. तिथे जाणे, आशीर्वाद घेणे योग्य आहे. बाकी त्यावर बोलायचे नाही. शुद्धीकरणाचा उद्देश ज्यांनी केला त्यांनाच विचारा'.
विनायक मेटे काय म्हणतात याला महत्व नाही - थोरात
'मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री अशोक चव्हाण यांनी लोकांना विश्वासात घेऊन चांगले काम केले. सुप्रीम कोर्टात वेळोवेळी योग्य पद्धतीने त्यांनी बाजू मांडली. पण यात भाजप अजूनही राजकारण करत आहे. पण काही बाबतीत राजकारण करू नये. केंद्रात भाजपचे सरकार आहे. आता केंद्राने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर वाढवून देण्यासाठी निर्णय घ्यावा. त्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही. यामुळे विनायक मेटे काय म्हणतात याला अजिबात महत्व नाही', असे थोरात म्हणाले.
'बैलगाडी शर्यत सुरू झाली पाहिजे'
'बैलांच्या शर्यती झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागात एक उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या या स्पर्धा आहेत. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण असते. त्यात बैलांना त्रास होत नाही. बैलांना संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याबाबतच्या निर्णयाबद्दल फेरविचार करणे आवश्यक आहे. ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू धावत असतील तर त्यांना त्रास होतो, असे म्हणावे लागेल', असे म्हणत त्यांनी बैलगाडी शर्यतीचे समर्थन केले.
'बैलगाडी शर्यतीबाबत भाजप दुटप्पी'
'भाजपचे सरकार केंद्रात आहे. त्यांना काही म्हणायचे नाही. इकडे मात्र बैलगाडी शर्यत झाली पाहिजे, असे म्हणतात. ही भाजपची नेहमीची दुटप्पी भूमिका असते', असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
हेही वाचा - स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसेंची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट? वाचा सविस्तर...