नागपूर - कोरोनावर प्रतिबंधात्मक लसीच्या मानवी चाचणीला येत्या एक-दोन दिवसात सुरुवात होणार आहे. देशभरात 12 ठिकाणी होणार असून यात महाराष्ट्रातील नागपूरचाही समावेश आहे. नागपूरच्या गिल्लुरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही चाचणी पार पडणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास येत्या १५ ऑगस्टला ही लस लॉन्च करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दररोज करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशात कोरोनावर प्रभावी लस व औषधे शोधण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आयसीएमआर व हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या वतीने विकसित करण्यात आलेली लस (vaccine) मानवी चाचणीसाठी तयार आहे. यापूर्वी या लसीची चाचणी वन्य प्राण्यांवर करण्यात आली होती. त्यामध्ये चाचणीचे सकारात्मक परिणाम समोर आले होते.
देशात १२ ठिकाणी मानवी चाचणी...
देशभरातील 12 ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार असून महाराष्ट्रातून नागपूरचाही समावेश आहे. १८ ते ५५ वयोगटातील निरोगी वक्ती ज्यांना कोरोनाची लागण नाही, अशी व्यक्तींवर ही चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी आता व्हॉलेंटीअर शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या चाचणीसाठी नागपूरच्या गिल्लूरकर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. संशोधन विभागाचे प्रमुख डॉक्टर आशिष ताजने यांच्या नेतृत्वात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून त्यासाठी रुग्णालय सज्ज झाले आहे.
हेही वाचा - CORONA VIRUS : राज्यात शुक्रवारी 6 हजार 364 नवे कोरोना रुग्ण; 198 मृत्यू
अशी करणार चाचणी...
कोरोना लसीच्या चाचणीसाठी नागपुरातून सुमारे 50 निरोगी स्वयंसेवकांची (volunteer) ची निवड करण्यात येईल. चाचणीसाठी (लस स्वतःवर टोचून घेण्यासाठी) तयार असल्याचे व ठरवून दिलेले निर्देश पूर्णपणे पाळून देण्याचे हमीपत्र भरावे लागेल. स्वयंसेवकांच्या आरोग्याच्या आवश्यक असलेल्या चाचण्या पूर्ण केल्यावर लस देण्यात येईल. लस दिल्यावर व्यक्तीच्या शरीरात कुठले बदल झाले याची नोंद घेण्यात येईल. पहिला दिवस, 14 वा दिवस, 28 वा दिवस, 42 वा दिवस व 192 वा दिवस याप्रमाणे व्यक्तीचे लसीकरण करण्यात येईल.
पहिल्या टप्प्याचे प्रयोग यशस्वी झाल्यावर 15 ऑगस्टपर्यंत लस बाजारात उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर शरीरात करोना विषाणूपासून लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज या लसीच्या मदतीने कृत्रिमरीत्या तयार करून कोरोना विषाणूचा नायनाट करण्याचे हे तंत्रज्ञान असल्याचे डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले.