नागपूर - नागपूर ही गुन्ह्याची राजधानी बनली असून ही ओळख पुसण्याचे काम करणार आहे, असे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. राज्यात औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर शहराची नावे गुन्हे शहरात येतात, तर देशात मुंबई, पुणे आणि नागपूरचे नाव येत असल्याचे ते म्हणाले. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणातील काही गुन्हे मागे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'राज्य सरकारचे 'रिमोट सिल्वर ओक'वर, त्याची 'बॅटरी' दिल्लीत'
कोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवारांनी पत्र लिहून एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, अशात आम्हाला न विचारता अचानक एनआयएला तपास दिला. त्यांचे काही लोक अडचणीत येतील, अशी केंद्रातील सरकारला अशी भीती आहे. म्हणून एनआयएला तपास दिला अशी शंका देशमुख यांनी व्यक्त केली. पण अशात राज्य शासन बघ्याची भूमिका घेणार नसल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - गडकरी अन् फडणवीसांच्या गोलंदाजीवर हार्दीक पांड्याची तुफान फटकेबाजी
विशेष तपास पथकाकडून (SIT) कोरेगाव-भीमा प्रकरणाची सखोल चौकशी झाली असती. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपविला. ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे. काही जणांना वाचवण्यासाठीच केंद्राने हा तपास 'एनआयए'कडे दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. शरद पवार यांची सुरक्षा हटवली यामागे षडयंत्र आहे, असे त्यांनी सांगितले.